पावसाळी पिकनिकची ठिकाणे

खास पावसाळी पिकनिक साठी … (पावसाळी पिकनिकची ठिकाणे)

पावसाळा सुरु झाला की वातावरणात कमालीचा गारवा तयार होतो . अशा या चिंब पावसात भिजण्याची आणि आनंद लुटण्याची तयारी लहानांपासून-मोठ्यापर्यंत सर्वाची असते. तरुणांचे  कुठे ट्रेकला जाण्याचे तर कुठे वन डे पिकनिकला जाण्याचे बेत सुरु होतात. कोणी  आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत तर कोणी  आपल्या परिवारासोबत हा पावसाचा आनंद लुटण्यास वन डे पिकनिक का होईना फिरायला जाण्याचे बेत आखतात. मग कोणी माळशेज घाट तर कोणी अगदी लोहगड अशा अनेक ठिकाणी जाऊन पावसात भिजण्याचा आनंद पूर्ण करत. अशाच अनेक पावसाळी पिकनिक ठिकाणांची माहिती आपल्या वाचकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हा पावसाळी पिकनिक ठिकाणांचा घेतलेला आढावा.

 तुंगारेश्वर-

कुठे- मुंबई-अहमदाबाद हायवेलगत, वसई.

मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर असलेले हे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण  आणि पिकनिक स्पॉट. वसईजवळील हा प्रसिद्ध धबधबा. या ठिकाणावर प्रसिद्ध शिवमंदिर असून जंगलही आहे. नदी आणि धबधबा अशा दोन्हीचा आनंद या ठिकाणी घेता येतो. वसई रोड स्थानकावरून एसटीने तुन्गारेश्वारला जाता येते तसेच स्वत:चे  वाहन असल्यास उत्तम. पर्यटकांसाठी खाण्या-पिण्याची सोय डोंगरावर नाही. तुंगारेश्वर मंदिराजवळ खाण्या-पिण्याची सर्व सोय उपलब्ध असते. 

कोंडेश्वर धबधबा-
कुठे- बदलापूर

बदलापूर रेल्वे स्थानकापासून पूर्वेला साधारण १४ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. श्रीशंकर आणि गणपतीचं मंदिर तिथे आहे. शंकराच्या मंदिरामुळे या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडल आहे. पंधरा फुटांवरून कोसळणारा हा धबधबा मन मोहून टाकतो. मुंबईचे असो किंवा बदलापूरचे स्थानिक पर्यटक असोत, पावसळ्यात पिकनिकसाठी त्यांची पहिली पसंती या धबधब्याला असते. येथे जाण्यासाठी बदलापूर पश्चिमेला एसटी स्थानकावरून टमटम ने जाऊ शकता.  

कान्हेरी-
कुठे- बोरीवली

 

मुंबई उपनगरातील आवडतं पावसाळी पिकनिक स्पॉट. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात अनेक धबधबे आहेत. कॉलेज तरुणाचे सर्वात आवडते ठिकाण. या उद्यानाच्या गेटवरून कान्हेरी गुंफेकडे जाण्यासाठी या उद्यानाच्याच बसेस आहेत. गुंफेच्या पायऱ्या वरून येणारे या धबधब्याच्या पाण्याखाली अनेकजण पावसाळी आनंद लुटतात.

चिंचोटी धबधबा-

 कुठे- मुंबई-अहमदाबाद हायवेलगत, कामन जंक्शन.

मुंबईतील सुंदर हिरवळीचा भाग म्हणजे चिंचोटी धबधबा. विकेंडला हमखास गर्दी असणारा हा धबधबा. चिंचोटी येथे उतरून या मुख्य धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी सुमारे तासभर वेळ लागतो. इथे पोहचताना हिरवळ झाडाझुडपातून जावे लागते. या धबधब्यापर्यंत पोहोचताना अनेक रानफुल व औषधी वनस्पती पाहायला मिळतात. सुमारे तासभर पायपीट केल्यावर पांढ-या शुभ्र चिंचोटी धबधब्यापर्यंत पोहचता येते. येथे जाण्यासाठी दहिसर टोलनाक्यानंतर ‘कामन’ जंक्शनजवळ हे ठिकाण आहे. ट्रेनने जायचे असल्यास नायगाव स्थानकावर उतरून रिक्षाने जावे लागते. धबधब्याजवळ कोणतही खाण्यापिण्याची सोय नाही. त्यामुळे घरातून निघताना जेवणाची सोय नक्की करा.

माळशेज घाट-

कुठे- कल्याण-मुरबाड मार्ग

 मुंबईतील ट्रेकर्स व पिकनिक साठी प्रसिद्ध असलेला घाट म्हणजे माळशेज घाट. या घाटावरील काड्यावर पडणारा मुसळधार पाऊस आणि त्यातून फेसाळत येणारे धबधबे हि या घाटाची खासियत. येथील पावसाळ्यातील विशेष बाब म्हणजे येथील जलाशयात येणारे फ्लेमिंगो पक्षी. हे पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी जमते. या ठिकाणी गेलात तर नक्कीच हरिश्चंद्रगड व शिवनेरी या ठिकाणी भेट द्या. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रिसोर्ट मध्ये पर्यटकांची जेवणाची सोय आहे.

भिवपुरी धबधबा-

कुठे- भिवपुरी

 भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणारी अर्ध्या पाऊन तासाची पाउलवाट भिवपुरी धबधब्याकडे घेऊन जाते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रुपाने खाली येत आणि सपाट जमिनीवर पसरत. त्यामुळे परिवराकरिता अगदी सैफ धबधबा म्हणावा लागेल. त्यामुळे धबधब्याचा मनमुराद आनंद येथे लुटता येतो. या ठिकाणी जेवणाची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु स्थानकाजवळ काही हॉटेल्स आहेत तसेच जर गावकऱ्यांना सांगितलं तर ते जेवणाची व्यवस्था करून देतात.

माथेरान-

भर पावसात माथेरानला जाऊन भिजण्याची मजा काही औरच. नेरळ ते माथेरान या टप्यात एक धबधबा लागतो. तो मिनी ट्रेनच्या जुम्मापट्टीचा. माथेरानला जाणारे लोक या धबधब्यावर हमखास थांबतात. नेरळ स्थानकावर उतरून साधारणपणे तासभरात येथे पोहचता येते.

– प्रसाद शिंदे
PC:Unknown

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu