महाराष्ट्रीयन लग्न ग्रहमकापासून बोडणापर्यंत ……
स्त्री पुरुष हे जीव शास्त्रीय दृष्ट्या दोन स्वतंत्र व्यक्ती विशेष आहेत .तथापि त्या दोहोंमध्ये निसर्गत:च विलक्षण आकर्षण असते . स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक आकर्षणातून उत्पन्न झालेल्या विवाहाला समाजस्थैर्याचा आधारभूत अशा ‘विवाह संस्थेचे’ उद्दात रूप देण्याचे महत्वपूर्ण कार्य “विवाह संस्कार” करतो . विवाह हा स्थिर म्हणजे दीर्घकाळ टिकणारा कसा राहील , त्या योगे घराण्याला स्थैर्य लाभून मागील व पुढील पिढ्यांना व पर्यायाने समाजाला स्थैर्य कसे लाभेल यासाठी धर्मशास्त्रकारांनी अनेक विधी ,नियम आणि कायदे प्रस्थापित केले . विवाह हा स्थिर आणि सुप्रजाकारक कसा होईल ही काळजी समाज धुरीणांच्या मनीमानसी वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत सदैव लागलेली दिसते .याच काळजीतून विवाह संस्कारांची उभारणी झाली आहे.
सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा विलक्षण प्रयोग विवाहाच्या रूपाने केला जातो . वधूवरांचे यावज्जीव मनोमिलन हाच विवाह्स्थैर्याचा एकमेव मार्ग आहे हे ओळखून ते ‘विवाह संस्काराने’ साध्य करण्याचा प्रयत्न केला असून , त्या दृष्टीने विवाह्संस्कारांची आणि ह्या मागील छोट्यामोठ्या विधींची हेतुत: मांडणी केलेली दिसते .थोडक्यात ‘विवाह्स्थैर्य’ , ‘चिरस्थायी समाधान’ , ‘उत्तम संतत्ती’ आणि ‘समाजस्वास्थ्य’ हे आदर्श साध्य करण्याचा मानस ठेऊन विवाह संस्कार विधी निश्चित केलेले दिसतात.
मानवी विवाहाचे एकूण आठ प्रकार आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहेत.
१) ब्राह्म विवाह, २) दैव, ३) प्राजापत्य, ४) आर्ष, ५) गंधर्व, ६) आसुर, ७) पैशाच, ८) राक्षस.
उपरोक्त विवाह प्रकारांमधील “ब्राह्म विवाह” हा सर्वश्रेष्ठ मनाला असून “राक्षस विवाह” हा सर्वात कनिष्ठ गणला जातो. विवाह हा आपल्या जीवनातील १६ संस्कारांमधील सर्वश्रेष्ठ असा सोळावा संस्कार ऋषीमुनींनी – समाजधुरिणांनी मानलेला आहे. विवाह संस्कारांची रचना व क्रम साधारणत: पुढे दिल्या प्रमाणे :
१) साखरपुडा : लग्नात रुढीप्रमाणे आवश्यक धार्मिक गोष्टींखेरीज अनेक लौकिक गोष्टी ही केल्या जातात . त्यातीलच साखरपुडा ही लौकिक विधी होय. धार्मिक विधीत केल्या जाणाऱ्या” वांड. निश्चय ची ही लौकिक नांदी .साखरपुडा सोयीप्रमाणे चांगला दिवस पाहून लग्नाआधी बरेच दिवस करतात . त्यावेळी वराकडील मंडळी वरमाता किंवा दुसरी कोणी सुवासिनी , वधूला कुंकू लावून साडी भेट देतात वधूपक्षाकडून ही नियोजित वराला समुचित भेट मिळते . वधू वर एकमेकांना ‘अंगठी’ घालतात . त्यानंतर परस्पर परिचय , चहा पाणी -पेढे वाटून त्या गोड समारंभाची पूर्तता होते. त्यानंतर केळवण यांची सुरुवात होते . कापड खरेदी , दागिन्यांची तयारी , लग्नपत्रिका छपाई, निमंत्रितांच्या याद्या इ. गोष्टी उरकाव्या लागतात.
२) ग्रहमख (ग्रहयज्ञ संस्कार ) : ग्रहशांती निमित्त करण्यात येणारा हा यज्ञ लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा आधी आठ दिवस केला तरी चालतो . कोणतेही मंगल कार्य करण्याआधी नवग्रहांची कृपा व्हावी म्हणून हा यज्ञ केला जातो . यात नवग्रहांच्या पूजेला तसेच वरुण देवाच्या पूजेला महत्व दिले जाते. ग्राहमकाच्या दिवशी वराचे ( वधूचे ) घरचे केळवण तसेच वराच्या घरी वधूच्या आईवडिलांना पित्याच्या घरची मेजवानी – व्याही भोजन करण्याचा प्रघात आहे.
३)घाणा : घाणा भरणे हा एक लौकिक विधी आहे . घाणा भरताना दोन मुसळे आंब्याच्या पानांनी सुशोभित करून त्यांनी उखळात उडीद -सुपारी -तांदूळ -हळकुंड घालून ती पाच सुवासिनी लग्नाचा मुलगा ( मुलीकडे मुलगी ) व आई वडील मिळून कांडतात . मुलीकडील हळद घेऊन आलेल्या सुवासिनी आपण आणलेल्या तेलाच्या वाटीत नवरदेवाला पायाचा अंगठा बुडवायला सांगून ती तेल हळद घेऊन मुलीकडे जातात .त्याने स्नान घालून उरलेली हळद व तेल (उष्टी हळद ) मुलाच्या अंगाला लावून त्याला मंगल स्नान घालतात . त्यातील रूपकात्मक शरीर संबंधांची कल्पना यावी.
४) देव प्रतिष्ठा : देवक ठेवणे वधूपिता, वाधुमाता व वधू तसेच वरपिता, वरमाता व वर आपल्या घरी किंवा विवाहस्थळी वेगवेगळे देवक ठेवतात . यावेळी प्रथमत: गणेश पूजन, वरूण पूजन-कुलस्वामी-मंडप देवता यांचे पूजन करून कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी यांची प्रार्थना केली जाते . तसेच ब्राह्मणांचे आशीर्वाद ग्रहण केले जातात. आंब्याच्या पानांनी हळद चढविणे , यजमान – नवरा ,नवरी यांना आप्तेष्टांच्या भेटी किंवा आहेर , सुवासिनींकडून लामण दिव्यांची कुरवंडी वगैरे गोष्टींचा या संस्कारात समावेश होतो.
५) वाङनिश्चय : नियुक्त वरास विवाह विधीच्या साह्याने कन्या अर्पण करण्याचा आणि वरपित्याने ही कन्या स्व पुत्रासाठी स्वीकारण्याचा मनोदय जाहीरपणे व्यक्त करणे हे वांड. निश्चय विधीचे मुख्य उद्दिष्ट होय .लौकिक दृष्ट्या वांड. निश्चय म्हणजे वधू व वर पक्षाने परस्परांच्या संमत्तीने केलेला लग्नाचा करार होय .व्यवहार दृष्टीने ही ह्या विधीचे महत्व विशेष आहे . या विधीच्या निमित्ताने वधू वर तसेच दोन्ही पक्षांकडील आप्त एकत्र जमून परस्परांचा परिचय करून घेतात . वधूला साडी देऊन एखादा दागीनाही देण्याची पद्धत आहे . वराला ही पोशाख दिला जातो . वरची आई तसेच पाच सुवासिनी वधूची ओटी भरून – दिव्याची कुरवंडी करतात.
६) सीमांत पूजन : विवाहाचा एक अंगभूत सीमेवर वरपूजन ( स्वागत ) करण्याचा विधी म्हणून हा सीमांत पूजन विधी विवाह संस्कारात समाविष्ठ झाला. गणेश पूजन करून वराचे पाय धुवून , वस्त्रेभूषणे , विडा नारळ देऊन त्याचा मान करतात .तसेच वरपक्षाकडील इतर मंडळीनाही अत्तर , गुलाब पेढा देऊन सन्मान केला जातो . ज्येष्ट जावई असल्यास ज्येष्ट जावई , मुलगी , नातवंडे यांचाही वधूपिता मान करतो . याच वेळी व्याही भेट करण्याची पद्धत आहे . यावेळी विहीण बाईना देण्यासाठी चौरंग, त्यावर रेशमी रुमाल, गुळाची ढेप , चांदीची वाटी व त्यामध्ये हलवा, एक जरीची हिरवी साडी – ब्लाउज पीस ,नारळ वगैरे ओटीची तयारी वस्तू देण्याचीही प्रथा आहे.
७) रुखवत : वर ,वरपिता , वरमाता तसेच मुलाकडील मानाची जी माणसे असतात ती व लहान मुले यावेळी जेवायला बसतात . जेवायला बसल्यानंतर वधूची आई जावयाला तुपाची आपोवणी देते . तसेच जेवणानंतर पाच पानांचा विडा करून त्यामध्ये चांदीचा रुपया घालून द्यावयाचा असतो .त्याला ओले रुखवत म्हणतात . दुपारी जेवणानंतर विहिणीला व मानाच्या बायकांना सुपारी , साखर तसेच चांदीच्या लवंगा देतात .
८ ) मधुपर्क : मधुपर्क म्हणजे दही व मध यांचे मिश्रण , हा मधुपर्क नवरदेवाला प्राशन करावयास देऊन त्याचा मोठा सत्कार केला जातो . विवाहाकरता वर मंडपात आल्यानंतर त्याला ओवाळून बसण्याकरता दर्भासन प्रदान करतात .नंतर त्याचे पाय धुवून मधुपर्क प्राशनासाठी दिला जातो .गंध , अक्षता , फुले ,वस्त्र, जानवी जोड , अलंकार वगैरे शक्य असेल तेवढे देऊन वरची पूजा व सत्कार करतात . वराबरोबर आलेले ब्राम्हण व नातेवाईक यांचाही मान केला जातो.
९ ) गौरीहार पूजा : लग्नाला बोहल्यावर उभे राहण्या पूर्वी वधूने गौरी व शंकर तसेच इंद्राणी यांची पूजा करावयाची असते . पाटा व वरवंटा यावर हळदीने गौरी व हर यांची चित्रे काढून त्या भोवती सुत गुंडाळतात किंवा एका पाटावर गौरी हाराची बोळकी ( साखरेची किंवा लाकडाची एकावर एक अशी चिकटवलेली पाच बोळकी असतात ) मांडतात . मुलीला तिचे बरोबर देण्यासाठी आणलेली अन्नपूर्णेची मूर्ती पाटावर मध्यभागी ठेवतात . तसेच तांदुळाच्या राशीवर इंद्राणी करिता सुपारी मांडतात . पाटावर बाजूला लादुगडू ठेवतात . या देवतांची ( गौरीहर पूजा ) वधूने करायची असते.
१० ) घटी पूजन : घटी म्हणजे तांब्याचे एक विशिष्ट आकाराचे भांडे , याला तळांत एक बारीक छिद्र असते . ते पाण्याच्या घंगाळात ठेऊन पूर्ण भरून बुडाले म्हणजे एक घटका झाली असे मानतात . लग्नपत्रिकेत जो घटी , पळे यांचा मुहूर्त असतो तो मोजण्या करता यांचा उपयोग करतात .मात्र हल्ली या साधनाचा उपयोग क्वचितच केलेला आढळतो .
११) पत्रिका पूजन : कन्यापक्षीय व वरपक्षीय यांनी इष्ठ काळ कळावा म्हणून मुहूर्त पत्रिकेची (आमंत्रण पत्रिका ) / मुहूर्त रुपी सरस्वतीची पूजा करण्याची पद्धत आहे .
१२ ) अंत:पटधारण – मंगलाष्टके : मुहूर्त जवळ आल्यावर मंडपात मध्यभागी स्टेज वर पूर्व पश्चिम दोन पाट ठेऊन त्यावर तांदूळ राशी घालून बाजूला रांगोळी घालावी . अन:पटाच्या दिशा उत्तरेकडे करून तो दोन ब्राह्मणांनी असा धरावा कि मुहूर्ता आधी वधू वर एकमेकांना दिसू नयेत. पूर्वेकडे तोंड करून वधू व पश्चिमेकडे तोंड करून वराला उभे करतात . मंगलाष्टके चालू झाल्यावर वधूचा मामा वधूला बोहल्यावर आणतो .अंत:पाट धरल्यावर मुहूर्ताची मंगल वेळ येईपर्यंत सुमारे ५ ते १० मिनिटे मंगलाष्टके गायले जातात . आठ मंगल श्लोक म्हणजे एक अष्टक . या श्लोकात वधूवरांना उपदेश , आशीर्वाद ,शुभेच्छा दिलेल्या असतात .नवग्रह देवता यांची स्तुती असते . मुहूर्त वेळेला अंत:पट दूर केला जातो व प्रथम वधू वराला व नंतर वर वधूला हर घालतो .
१३ ) कन्यादान : कन्यादान हे परंपरेने पृथ्वीदानाइतके महत्वाचे मानले आहे . समाजहिताच्या दृष्टीने कन्यादान करून कन्येला संसाराला लावणे अत्यंत आवश्यक कर्तव्य आहे . म्हणून कन्यादानाचे महत्व समाजात बिंबवणे आवश्यक आहे . योग्य स्थळी कन्यादान होऊन चांगली प्रजा निर्माण झाली म्हणजे कन्यादानाची सांगता झाली असे मानण्यात येते .कन्यादानाच्या वेळी कन्येचा वधू म्हणून स्वीकार करताना येणारी जबाबदारी – बंधने यांची वराला जाणीव दिली जाते .
विवाह सर्व अर्थाने सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोग घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही असा निश्चय / वचन वराने द्यावे लागते .
१४ ) सुवर्णाभिषेक : कान्यादानानंतर पाणी मंत्रवून ब्राह्मण वधूवरांवर अभिषेक करतात .
१५ ) कंकण बंधन : वधूवरांच्या भोवती मंत्रघोषाने सुत्रबंधन करण्याचा विधी . वधूवरांना एकत्र बांधून टाकणारा सुत्रावेष्टनाचा हा जणू प्रणय पूर्ण संस्कार आहे .
१६ ) अक्षता रोपण – मंगळसूत्र बंधन : मंत्राघोशामध्ये वधू वराच्या मस्तकावर व वर वधूच्या मस्तकावर अक्षता घालतात . माझी ऐश्वर्य प्राप्तीची , संपत्तीची , संतत्तीची इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना वधू करते . तर माझी यशाची , त्यागाची , धर्माची , कीर्तीची इच्छा पूर्ण होवो अशी इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना वर करतो . इष्ठदेवतेचे स्मरण करून त्याच वेळी वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो . ते बांधताना तो अशी प्रार्थना करतो की हे पतिव्रते माझ्या जीवनाला कारण किंवा त्याचे प्रतिक असे हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो . तू माझ्यासह १०० वर्षे सुखाने नांद. याच वेळी मुलीला बांगड्या पाटल्या इ. नी अलंकृत केले जाते.
१७ ) विवाह होम – लाजा होम – सप्तपदी – गृहप्रवेश होम: वैदिक मंत्राधारित विवाह होम आणि त्याच्या अंतर्गत सात विधी १) होम २) पाणी ग्रहण ३) लाजा होम ४) अग्निप्रदक्षिणा ५) अश्मारोहण ६ ) सप्तपदी ७ ) ध्रुव दर्शन हे केंद्रबिंदू मानून विवाह संस्कारांची रचना केली आहे . घर चालवणे , संतत्तीचे पालन पोषण या जबाबदाऱ्या निसर्गानेच स्त्रीवर सोपवल्या आहेत .
या जबाबदाऱ्या तिच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्त करणे हे विवाहोमांतर्गत विविध विधींचे उद्दिष्ट असावे .
वैदिक विवाह संस्कारांमध्ये आवश्यक मानलेले सात प्रमुख विधी –
१) होम : विवाहहोम ही गृहस्थाश्रमाची स्वीकार केल्याची साक्ष होय . या होमात प्रजापतीला आयुष्य प्राप्तीसाठी भूपती ,चंद्र , अग्नी ,इंद्र , वरुण यांना धनासाठी व यम ,धर्माला स्त्री पुरुषांना अकाली मरण येऊ नये म्हणून आहुत्या दिल्या जातात .
२ ) पाणी ग्रहण : विधीपूर्वक वधूचा हात स्वीकारणे .
३ ) लाजा होम : वधूवरांच्या समृद्धी प्रीत्यर्थ हा विधी असतो . या वेळी जे तीन मंत्र म्हणतात यामध्ये पतीशी ‘चीरसंयोग’ , ‘पितृकुलविमोचन’, ‘ पतीला दीर्घायुष्य’ , व बांधवांची समृद्धी अशी प्रार्थना आढळते .
४) अग्निप्रदक्षिणा : संत्तती, संपत्ती आणि आरोग्य या ऐहिक सुखांच्या प्रित्यर्थ वधू वरांद्वारा हा विधी केला जातो .
५ ) अश्मा रोहण : वधूने वराच्या आयुष्यात आजन्म अचल (स्थिर ) रहावे आणि सहधर्मचारिणी बनून वराला धीर देणारी आणि त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारी मैत्रीण बनावे अशी अपेक्षा अभिप्रेत आहे .
६) सप्तपदी :या विधीमध्ये वाधुसमावेत सात पावले टाकताना वराच्या वधूच्या संबंधी अपेक्षा, तसेच तिच्या विवाहोत्तर कर्तव्यांची जाणीव याचे दिग्दर्शन आहे .
या विधीतील सप्तपदी विधीचे रूपाने आपण उभयता विष्णू – लक्ष्मी स्वरूप असून त्यांच्या प्रमाणेच उदात्त व आदर्श गृहस्थाश्रमी जीवन जगायचे आहे हे वधूवरांना सुचवायचे असते. जालाभिषेकाद्वारा पत्नीची जणू गृहस्वामिनी पदावर वराने नियुक्ती केली आहे असे दिसते. याचे उलट ‘हृदयस्पर्शन’ विधीच्या द्वारा वधूवरांचे मनोमिलन सूचित केले आहे .
७) ध्रुव : अरुंधती -सप्तर्षी यांचे दर्शन : सप्तपदी झाल्यानंतर रात्री वधू वर उघड्यावर येऊन ध्रुव, अरुंधती ,सप्तर्षी यांचे दर्शन घेतात .ही एक प्रकारची प्रतीकोपासना आहे. ध्रुव हे अढळ्तेचे प्रतिक , अरुंधती ही स्त्रियांची आदर्श आणि सप्तर्षी आपले पूर्वज म्हणून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या प्रमाणे वागण्याचा निश्चय करणे असा या विधीचा उद्देश आहे .
या विशिष्ट दृष्टीने या विधींकडे पाहिल्यास हे संस्कार प्रतीकालकता व सुचक्ते द्वारे वधू वरांना भावी आयुष्यातील कर्तव्यांबाबत जाणीव करून देतात असे ध्यानात येते .
१८ ) ऐरणी दान : विवाहाचे ‘ वंशवृद्धी’ हे प्रमुख उद्दिष्ट रूपकात्मक पद्धतीने या विधीत सांगितले आहे . आप्त स्वकीयांचा सन्मान करण्याची संधी त्यायोगे मिळते . उमा महेश्वराची पूजा करून – वंश वृद्धी प्रीत्यर्थ वराच्या आईला ऐरणी दान करतात .
१९) वरात : ऐरणी दानानंतर वधू वरांच्या हातावर दही साखर देऊन त्यांना निरोप दिला जातो व नंतर वाजत गाजत वधूला घेऊन वर आपल्या घरी जातो .
२०) गृहप्रवेशनीय विधी : मंत्रपठण करीत ब्राह्मणांसह वधू-वर गृहप्रवेश करतात . नंतर गणेशपूजन ,लक्ष्मी पूजन केले जाते.
२१) देवकोत्स्थापन : लग्नविधी पुरा झाल्यावर सुरुवातीला ठेवलेले ‘देवक’ ( देवप्रतिष्ठा) विधियुक्त उत्तर पूजन करून विसर्जित केले जातात. विवाह संस्कारात दोन कुले जोडली जातात , दोन मने एक होतात आणि स्त्री पुरुष प्रणय याला शास्त्राची आणि वडिलधाऱ्या माणसांची जाहीर संमत्ती मिळते . लग्न सोहळ्यात होणाऱ्या धार्मिक विधीत व्यवहार , शृंगार आणि नर्म विनोद यांचा सुंदर मिलाप झालेला दिसेल .या सर्व सोहळ्याची रचनाच अशी केलेली आहे की त्यांत वधुवरांची जाहीर सलगी वाढतच जावी . विवाह संस्कार मनावर उदात्त परिणाम करतो . त्यात देवदेवतांची पूजा व प्रार्थना आहे तशीच वेदकालीन अग्निपुजेची व यज्ञसंस्थेची आठवण आहे . वडील मंडळींचा योग्य सन्मान त्यात आहे . वधूपक्ष व वरपक्ष यांनी करायचा परस्परांचा प्रेमळ आदर सत्कार आहे . हौस मौज आहे थोडा प्रेमळ रुसवा फुगवा आहे . अंत:पटाने होणाऱ्या क्षणभर विरहाचे वधूवरांच्या प्रीतीमिलनात रुपांतर होण्याची किमया आहे . वधूवरांना एकत्र बांधून ठेवणारा सुत्रवेष्ठानाचा प्रणय पूर्ण संस्कार आहे .अग्निसमक्ष परस्परांशी एकनिष्ठ राहण्याचे वचन वधूवर या संस्कारात एकमेकांना देतात . आणि परस्परांच्या संगतीत सात पावले चालून यांचे पतीपत्नीचे नाते दृढ होते . उंबरठ्यावरचे माप ओलांडून प्रवेश करणाऱ्या गृहलक्ष्मीच्या आगमनाने वधू वरांचे लाड केले जातात , तशीच कर्तव्याची जाणीवही त्यांना करून दिली जाते .विवाहाने बद्ध होऊन ब्राम्ह्चर्याश्रमातून गृहस्थाश्रमात वधू वरांनी प्रवेश करायचा तो उत्तम धर्माचरण करून अग्निपूजा करण्याकरिता , गृहस्थाश्रमाचे पालन करण्याकरता आणि वंशवेल वाढवण्याकरता ,विवाहसंस्कारांतून सुचवलेल्या प्रणयाचा आस्वाद अनिर्बंद नाही त्याला रुढीची , पवित्र संस्काराची ,कर्तव्याच्या जाणिवेची आणि आशीर्वादाची झालर लावली आहे . म्हणूनच लग्न कंकण बांधून विवाहाचा धर्माबंधानात पडणाऱ्या व्यक्तींना ते बंधन सुखद वाटते .
आमचे विवाह मंत्र व मुख्य विधी वैदिक काळापासून आज हजारो वर्षे अव्याहत चालत आले आहेत . रजिस्टर लग्नाची सवलत असली तरी हिंदूंचे मन सामन्यात: धार्मिक पद्धतीनेच लग्न करावे या बाजूला झुकते .
– श्री एकनाथ वा. साठे
PC:Unknown