वाईनच्या माहेरघरी जगाच्या पाठीवर

फ्रांस म्हटलं की फॅशनची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पॅरिसच आपल्याला आठवत. युरोपच्या सहलीतही फ्रांस म्हणजे फक्त पॅरिसच बघितलं जात. पण तिथल्या कंट्रीसाईडची मजा काही औरच आहे. त्याचीच ही झलक.
फ्रांस म्हटलं कि आपल्याला आठवत ते फॅशनची पंढरी म्हणून सुविख्यात असलेलं पॅरिस, तिथला आयफेल टॉवर … तिथला तो जगप्रसिद्ध लिडो शो, मायानगरी असलेल्या पॅरिसचा, अत्यंत गजबजलेला , नटलेला शॉन्ज लिजे रस्ता…
काही सावरकर प्रेमी आवर्जून भेट देतात ते मार्सेलिसला… पण यावर्षी मीही सुप्रसिद्ध शहरे सोडून तिथल्या छोट्या शहरात फिरून यायचं ठरवलं. माझ्या फ्रेंच मैत्रिणीच्या आग्रहाला मान देऊन तिच्या घरी राहून या जून महिन्यामध्ये मी अत्याधुनिक फ्रान्सच्या सांदी कोपऱ्यातील निवांत जीवनशैलीचा आनंद घेतला.

आयुष्यभर पॅरिस मध्ये नोकरी केल्यानंतर माझी मैत्रीण तिच्या मूळ गावी पश्चिम फ्रांस मधल्या शॅलॉन्स इथे राहायला आली आहे. तिथले बरेच जण अशी गावाकडची घरे विकत घेऊन शहरी गजबजाटापासून दूर (सुशेगाद ) आयुष्य घालवण्यासाठी इथे राहायला येतात. मुद्दाम जुनी घरं विकत घेऊन ती आहेत तशीच जतन करणं याची विशेष आवड इथल्या लोकांना आहे.
युरोपला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. अनेक नद्यांच्या गाळामुळे इथल्या जमिनीचा कस चांगला आहे. वर्षातले ६ ते ७ महिने इथे पाऊस पडत असतो. शिवाय इथली हवाही थंड असल्याने अनेक पिकांसाठी सुयोग्य आहे. या सुपीक जमिनीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अक्षरश: इंच न इंच जमिनीचा फार चांगला वापर युरोपीय लोकांनी केलेला आहे. मी जिथे राहिले होते त्या शॅलॉन्स परिसरातल्या लोकांचा तर गेल्या अनेक वर्षांपासून शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. गावातून बाहेर पडलं कि रस्त्याच्या दुतर्फा शेतं दिसायला लागतात. गहू , मका , बटाटे , अनेक भाज्या आणि फळे ते इथे पिकवतात. पण फ्रांस हा मुख्यत्वे वाईन व चीज उत्पादनात अग्रेसर असलेला देश आहे. इथे होणाऱ्या विशिष्ट जातीच्या द्राक्षांपासून तर उत्तम प्रतीची वाईन बनते. इथल्या वाईनला युरोपभर आणि जगभरात कायमच मागणी असते.
तिथून जवळच असलेली ‘बोव्हेत लादुबे’ (Bouvet Ladubay ) ही वायनरी बघायला आम्ही गेलो. ही नैसर्गिक गुहांमध्ये असलेली वायनरी आहे. डोंगर पोखरून दगडांच्या खाणीसाठी दगड काढल्या नंतर या गुहा तयार होतात. १२ व्या शतकापासून हे खाणींचे काम इथे होत होते. या नैसर्गिक गुहांमध्ये खांबाचा आधार देऊन मोठ्या खोल्या बनवण्यात आल्या. इथे दगडांमधून सतत पाणी झिरपत असल्यामुळे आतमध्ये नैसर्गिक गारवा असतो. या नैसर्गिक दगडांच्या गुहेत या बनवलेल्या वाईनला चोखंदळ रसिकांची विशेष पसंती असते. शॅलॉन्सच्या जवळच असलेल्या सौमुर परिसरात तर या गुहांमध्ये चक्क घर बांधलेली दिसतात. सौमूरच्या परिसरात
(Saumur ) चुन्याच्या दगडांचे डोंगर आहेत. खाणींमुळे बरेच डोंगर भुईसपाट होत होते. स्थानिकांनी यावर एक छान शक्कल लढवली आहे. डोंगरातल्या या गुहांमध्येच त्यांनी घरं बांधली आहेत. ३-४ किलोमीटर लांबवर टेकडीच्या बाजूने लागूनच चुन्याच्या दगडांची घरं बांधून त्यांनी पुढचा ऱ्हास टाळला आहे. ही ‘केव्ह हाऊसेस’ यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात. त्यात एकाने एक हॉटेलही बांधले आहे. इथे एका माणसाने तर आपल्या घरातच वाईन बनवण्याचा व्यवसाय चालू ठेवला आहे. चुन्याच्या दगडांची घरे आतून थंड असतात. त्यामुळे वाईनसाठी लागणारे सुयोग्य वातावरण सहजच मिळते. या संपूर्ण परिसरात अक्षरश: मैलोन्मैल पसरलेले हिरवेगार द्राक्षांचे मळे आहेत. ते पाहून डोळे सुखावतात. इथल्या वाईनरीमध्ये वाईन टूर आणि वाईन टेस्टिंगचा आनंद आम्ही लुटला.
सौमूर बद्दल अधिक सांगायचं तर हे फ्रान्सच्या पश्चिमेकडे असलेलं पर्यटकप्रिय छोटास टुमदार शहर आहे. इथला चौदाव्या शतकातला राजवाडा (कॅसल) हा फ्रेंच संस्थानिकांच्या काळात बांधलेला शेवटचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. १४ – १८ व्या शतकातली अनेक भित्तीचित्र टेप्सट्रीज (Tapestries) , उंची फर्निचर आणि सिरॅमिकच्या सुरेख मूर्ती इथे बघायला मिळतात. आता हा पॅलेस सरकारच्या ताब्यात असून इथे म्युझियम केले गेले आहे. इथून जवळच मोंत्सोरेऊ (Montsoreu) कॅसल आहे. इथल्या एका उमरावाने १५ व्या शतकात रेनेसान्स शैलीत हा किल्लेवजा राजवाडा बांधला. लॉयरे (Loire) नदीच्या काठावरचा हा राजवाडा याच्या रमणीय परिसरामुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी इंग्लिश , फ्रेंच सिनेमाचे शूटिंग नेहमी होत असते. अलेक्झांडर डयूमास (Alexander Dumas) या लेखकाच्या ‘La Dame de Mohsoreau’ या सुप्रसिद्ध पुस्तकातली कथा या वाड्याभोवतीच गुंफलेली आहे. शॅलोनपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेला Chateau De Serraut हा प्रासाद १६व्या शतकात volsh घराण्यातील एका धनिकाने बांधला आहे. हा प्रासाद अजूनही मूळ मालकांकडे आहे. त्यांनी तो अतिशय चांगल्या प्रकारे जतन केला आहे. कित्येक शतकांपूर्वीचे स्वयंपाकघर त्यातली तांब्याची भांडी , मोठाले ओव्हन हे सगळेच बघण्यासारखे आहे. १६४५ साली हॉलंडच्या एका फर्निचर बनवणाऱ्या कारागिराला इथे पाचारण करण्यात आले. एबनी आणि ओक लाकडापासून उत्कृष्ट कलाकुसर केलेले अप्रतिम कपाट त्याने बनवले. ग्रीक शैलीचे कोरीवकाम असलेल्या या मास्टरपीस मध्ये कपाटातले खण, चोरकप्पे सुबकपणे कौशल्याने बनवले आहेत. तर ओन्जर्स (Angers) इथल्या किल्ल्याची बांधणी १३व्या शतकातली आहे. मध्ययुगीन काळातील टेपेस्ट्रीज(Tepestries) हे इथले वैशिष्ट्य. या प्रासादातील १०० मीटर लांब आणि साडेचार मीटर उंचीची भव्य टेपेस्ट्री बघून थक्क व्हायला होते. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या बॉम्बहल्ल्यात फ्रांस बेचिराख झाला होता. तरीही इथली संस्कृती आणि त्या संस्कृतीची ओळख म्हणता येईल अशा अनेक निवडक वास्तू आजपर्यंत भक्कम स्थितीत आहेत. त्याचा प्रत्यय हे सगळे वाडे बघताना येत होता.
दर मंगळवारी शॅलॉनला विकली मार्केट भरते. हे विकली मार्केट म्हणजे आपल्याकडचा आठवडी बाजार ! आजूबाजूच्या परिसरातले लोक त्यांच्या शेतातल्या भाज्या , फळे इथे आणून विकतात. शहरातल्या मुख्य रस्त्यावर त्यांचे सुंदर स्टॉल लावतात. या बाजारातल्या ताज्या भाज्या आणि रसरशीत फळे बघून मन फार प्रसन्न होते. अस्परॅगस, पालेभाज्या, सॅलड, बटाटे , चेरी, स्ट्रॉबेरी, पीच, जर्दाळू, सफरचंदे, संत्री ही ऑरगॅनिक फळे इथे अतिशय सुरेख पद्धतीने मांडलेली असतात. विशिष्ट माणसांकडूनच माल विकत घेण्याकडे सगळ्यांचा कल असतो. काही स्टॉल्सवर विशेष गर्दी दिसली. स्वत:च्या शेतातल्या गव्हापासून घरगुती स्तररावर बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड लोक आवर्जून विकत घेत होते. एका वयस्कर माणसाच्या स्टॉल भोवती त्याच्या शेतातल्या ताज्या ऍस्परॅगससाठी झुंबड उडाली होती. आणखी एक माणूस भेटला – अफलातून चीज मेकर ! त्याने स्वत: निगुतीने बनवलेले २५-३० चीजचे प्रकार हा गावोगावच्या आठवड्याच्या बाजारांमध्ये जाऊन विकतो. गाई किंवा शेळ्यांच्या दुधावर वैशिष्टपूर्ण प्रक्रिया करून उत्तम प्रतीचे चीज बनवण्यात याचा हातखंडा आहे. त्याच्या चीजला मार्केटमध्ये तुफानी मागणी असते.
फ्रेंच लोक वाईन , चीज आणि गप्पा यांच्यात खूप रमतात. संध्याकाळ झाली की आपापल्या घरातून वाईनच्या बाटल्या आणि जेवण घेऊन कोणाच्यातरी घरच्या अंगणाच्या लॉनवर टेबले टाकून निवांत बसतात. मग पुढचे २-३ तास गजलीमध्ये त्यांचा वेळ सहज निघून जातो. फ्रेंच भोजनाची सुरुवात वाईननेच होते. डिपबरोबर स्टार्टर्स , युरोपीय भाज्यांचे आणि मासे – चिकनचे २-३ प्रकार , ब्रेड , चीज आणि नंतर स्वीट डिश एवढे तर हवेच. सगळ्यात शेवटी गरम कॉफीचा घोट घेतल्याशिवाय बैठक संपत नाही. इथे बहुतेक जण काळी कॉफीचं पितात.
आत्ताच्या माझ्या वास्तव्याच्या काळात फ्रान्समध्ये अतिवृष्टी झाली होती. नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीजवळ आले होते. शेलॉन गावातही नदीचे पाणी घरांच्या पायऱ्यांपर्यंत आले होते. सगळीकडे शेतांमध्येही पाणी भरले होते. नदीजवळ घरे असलेल्या लोकांकडे छोटी होडकी असतात. त्यांना अशा वेळी त्यांच्या रोजच्या कामासाठी अशाच होडक्यांचा वापर करावा लागतो. पावसाच्या या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आम्ही नदीत कॅनोईंगची मजाही लुटली. नॉन्थ ते ओन्जर्स या संपूर्ण प्रदेशात सपाटी आणि छोट्या टेकड्या यांचा सुरेख संगम आहे. सायकलिंगसाठी हा प्रांत सर्वाना आवडतो. युरोपीय लोकांमध्ये सायकलिंग ट्रेक खूप लोकप्रिय आहेत. टूर द फ्रांस या जगविख्यात सायकलिंग स्पर्धेचा मार्गही हाच आहे. इथे असे कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात. सायकलिंग , केनॉयिंग आणि पायी भरपूर भटकंती याचा पुरेपूर आनंद यावेळी मला मिळाला आहे. अशा हटके ठिकाणी छोट्या गावात जाऊन राहण्यातही मजा काही औरच आहे यात शंका नाही.

-राजश्री फणसाळकर
(संकल्प टूर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu