निसर्गस्वप्न स्कँडिनेव्हिया

युरोप च्या उत्तरेला असलेला नॉर्वे ,स्वीडन ,फिनलंड आणि डेन्मार्क मिळून बनलेला स्कँडिनेव्हिया ऐतिहासिक परंपरा व वास्तू या सोबत प्राकृतिक निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. श्री. सुनील तारकर यांच्या संकल्प टूर्सने आयोजित केलेल्या या सहलीसोबत आम्ही दोघांनी जायचे ठरवले. मुंबईहून इस्तंबूल मार्गे फिनलंडची राजधानी हेलसिंकीला पोहोचलो. फिनलंड मध्ये पावणेदोन लाखांपेक्षा जास्त सरोवरे व पाणीसाठे आहेत आणि द्वीप समूहात दीड लाख बेटे ! खुद्द हेलसिंकी सुधा अनेक बेटे जोडून वसलेले आहे. फिनलंड मध्ये भरपूर जंगले आहेत पण त्यांना अन्नधान्य आयात करावे लागते. तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र ते आघाडीवर आहेत. ‘नोकिया’ मोबाईलचा जनक देश म्हणजे फिनलंड !
जीन सिबेल्स या संगीतकाराचे स्मारक बघितले. नक्षीदार स्टीलच्या पोकळ नळ्या जोडून एक गीत लहर बनवली आहे. बाजूलाच सिबेल्सचा मुखवटा पुतळा आहे. फिनलंड चे वैशिष्ट्य म्हणजे दगडातून काढलेल्या लाद्या जगभरात रेल्वे स्टेशन ,मॉल्स मध्ये सर्रास वापरल्या जातात. इथले केव्ह चर्च भल्या मोठ्या प्रस्तरातून खोदून काढलेले आहे. या हटके वास्तूत संगीताचे कार्यक्रम होतात. हेलसिंकीचा स्टेडियमही बघण्यासारखा आहे. याच्या वरच्या मजल्यावरून संपूर्ण शहराचे दर्शन घेणे हा एक छान अनुभव आहे . दुसऱ्या दिवशी हेलसिंकीहून आम्ही क्रूझने स्टॉकहोमला जायला निघालो. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज यादीत असलेला ‘सुओमेनलीना फोर्टेस’ ताऱ्याच्या आकाराचा आणि ५ बेटांवर वसलेला आहे. क्रुझने जाताना उंचावरून त्याचे झकास दर्शन झाले.

स्वीडनच्या काडेपेट्या तर जगप्रसिद्ध आहेत. याच स्वीडन मध्ये जन्मलेला महान संशोधक म्हणजे अल्प्रेड नोबेल ज्याने जिलेटीन व सुरुंगाचा शोध लावला. त्याचा जन्म स्वीडनमध्ये, घर नॉर्वेमध्ये तर वास्तव्य फ्रांसमध्ये होते. नॉर्वेमध्ये ओस्लो या ठिकाणी शांततेचे नोबेल पारितोषिक दिले जाते. त्याची घोषणा स्टॉकहोममध्ये होते. स्टॉकहोममधल्या सिटी हॉलच्या ब्लु हॉल मध्ये नोबेल डिनर असते. यावेळच्या सजावटीसाठी नोबेलच्या फ्रांसच्या बंगल्यावरून फुले खास आणली जातात. हल्लीच मलाला करझाई आणि कैलाश सत्यार्थी यांना शांततेचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांचे फोटो बघताना आम्ही अगदी भारावून गेलो.
स्टॉकहोममधले वासाम्युझियम बघायला गेलो.स्वीडीश राजाने १६२८ मध्ये आपल्या आवडीनुसार बांधलेले जहाज प्रवासाच्या आधीच समुद्राच्या रासातळाशी गेले. त्याचे उत्खनन करून १९६१ साली ते पाण्यातून काढले गेले. १९९० पासून सध्या ते आहे त्या ठिकाणी ठेवले आहे. त्यातल्या चुका आणि चांगल्या गोष्टी यांचा समतोल विचार करून त्या परत जगासमोर मांडणे यासाठी लागणारा प्रामाणिकपणा स्वीडिश लोकांमध्ये आहे. त्यासाठीच ते जगप्रसिद्ध आहेत.
संपूर्ण युरोपात वेळ अगदी काटेकोरपणे पाळतात. सर्व बसेस अद्ययावत सोयीनी परिपूर्ण असतात. स्कॅन्डीनेव्हीयन देशांचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक बसेस मध्ये WIFI असते. म्हणजे Whatsapp वर बागडणारयांची चंगळच ! इथे रोजच्या वापरासाठी सायकल प्रत्येकाकडे असते.स्टॉकहोम ते ओस्लो (नॉर्वे) हा प्रवास बसने झाला. घरे ,कुरणे , हिरवीगार जंगले, माथ्यावर बर्फ असलेले डोंगर शिवाय कित्येक मैल साथ करणारे नदीचे वा समुद्राचे पात्र ! त्या पाण्यात दिसणारे डोंगराचे, घरांचे, आकाशाचे प्रतिबिंब डोळे तृप्त करत होते. कार्लस्टाड या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही दुपारचे भोजन घेतले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.

नॉर्वेची राजधानी ओस्लो म्हणजे मोठे बंदर. सागरी व्यापाराशी निगडीत अनेक कंपन्यांची कार्यालये या ठिकाणी आहेत. अकेर्सहूस फोर्टेस हा प्राचीन काळी संरक्षणासाठीचा महत्वाचा किल्ला होता. दुसऱ्या महायुद्धात हा नाझींच्या ताब्यात होता. ओस्लोमध्ये विजीलंड स्कल्प्चर पार्क बघितले. मनुष्य जन्मापासून वार्धक्यापर्यंतच्या विविध अवस्था दगडी आणि ब्राँझच्या शिल्पात कोरलेल्या आहेत. ‘मोनोलिथ’ हे एकाच शिलखंडात कोरलेले ५० फुटी शिल्प अप्रतिम आहे. नॉर्वे मध्ये स्की जंप हा खेळ लोकप्रिय आहे.
ओस्लोहून बसने आम्ही Geilo या स्टेशन वर आलो. Geilo ते Myrdal हा ट्रेनचा प्रवास होता. कधी सपाट प्रदेश तर कधी डोंगररांगांचा विलक्षण नजारा सतत दिसत राहतो. Myrdal ला उतरून फ्लमसाठी दुसरी ट्रेन घेतली . बर्फाळ प्रदेशातून जाणाऱ्या या ट्रेनचा प्रवास म्हणजे स्वप्नमय अनुभव ! आम्ही अधाशीपणाने फोटो घेत होतो. वाटेत एका ठिकाणी प्रचंड धबधबा दिसत होता. अचानकपणे त्याच्यासमोर गाडी थांबली. धबधब्याच्या प्रचंड रौरवात संगीत ऐकू येऊ लागले. पुढच्या कड्यावर पारंपारिक लाल कपड्यातली तरुणी नृत्य करू लागली. सगळे वातावरण एकदम स्वप्नमय झाले . फक्त २-३ मिनिटांचा प्रसंग पण पर्यटनाला चालना देण्यासाठी किती सुरेख कल्पना वापरल्या जातात याचे कौतुक वाटले.
Fjords च्या काठावरचे Flam हे अतिशय romantic चिटुकले शहर आहे. जवळच्या डोंगरावरून वेडीवाकडी वळणे घेत आमची बस सर्वात वरच्या ठिकाणी पोचली. तिथून दिसणारे डोंगर आणि शांत फीयोर्डसचे दृश्य केवळ लाजवाब ! याच फियोर्ड्स् मधून नंतर आमचा प्रवास झाला. फ़्लम ते गुडवँगऩ या फियोर्डमधून आम्ही बोटीने गेलो. २-३ तास दोन्ही बाजूला हजारो फुट उंचीचे डोंगरकडे आणि मध्ये फक्त शांत नितळ पाणी ! सगळे वर्णनातीत ! डोंगरावरचे बर्फ वितळून सतत खाली येत असते. पाण्याच्या अनेक वाटांमधून आपली बोट मार्गक्रमणा करते. गुडवँगऩ नंतर बर्जेन पर्यंत आम्ही बसने गेलो. नॉर्वे म्हणजे Land ऑफ Mother Nature’ याचा प्रत्यय प्रत्येक दिवशीच्या प्रवासात येत होता.
बर्जेन हेही नॉर्वेचे प्रमुख बंदर . तिथल्या ब्रिगेन या ठिकाणाला युनेस्कोच्या हेरीटेज यादीत स्थान मिळाले आहे. जुनी वस्ती ,निमुळते रस्ते यांनी जाणीवपूर्वकपणे राखून ठेवली आहे. माउंट फ्लायेन इथे केबल कारने (Funicular Train) जाता येते. वरून शहर बघताना बंदर, धक्के ,घरे ,बागा यांचे उत्तम नियोजन लक्षात येते.
आणखी एक दिव्य अनुभव घेण्यासाठी आम्ही उत्तरेला निघालो. बर्जेन ते अल्ट्रा विमान प्रवास – निसर्ग तर सतत आमच्या बरोबरच होता. या ठिकाणी इथल्या मुलाच्या सामी लोकांचे म्युझियम पहिले. पारंपारिक वेशभूषेत इथल्या तरुण मुली अस्खलित इंग्रजीत माहिती देतात. नॉर्वे ,स्वीडन ,फिनलंड आणि उत्तर रशिया या उत्तरेकडच्या प्रदेशात त्यांचे वास्तव्य असायचे आणि रेनडियर पालन हा मुख्य व्यवसाय ! त्यांची पुढची पिढी आता सरकारी मदतीने शिक्षण घेत आहे. उत्तरेच्या या भागात रेनडियरचे कळप मुक्तपणे फिरताना दिसतात.

Denmark

आता झाडांचे प्रमाण कमी होत गेले आणि आडव्या ठिसूळ डोंगररांगा ,त्यातून खणलेले बोगदे दिसायला लागले. एकदा तर तब्बल ८ किमीचा बोगदा लागला जो आपल्याला समुद्र सपाटीच्या २१२ मीटर खालून पुढच्या बेटावर घेऊन जातो. अनेक मैलांचा प्रवास पाण्याच्या समपातळीवरून आपण मानवनिर्मित रस्त्यांवर करतो. या रस्त्याला
‘रोड टू हेवन’ असे सार्थ नाव आहे. अखेरीस आम्ही Nord Kapp (७१°१०° N) या विस्तीर्ण माळावर आलो. रात्रीचे ९ वाजले होते. लख्ख प्रकाश होता पण आता वारे बोचरे व्हायला लागले . हि रात्र म्हणजे फक्त घड्याळातली ! सूर्य क्षितिजाकडे सरकार होता पण अस्ताला नाही. ढगांच्या किनारी चंदेरी , सोनेरी , नारिंगी रंगांनी चामकायच्या. ११. ४० च्या सुमारास सूर्य क्षितिजाजवळ पोचला आणि परत उलटा वर येऊ लागला. हे सगळे अनुभवणे म्हणजे या सहलीचा कळसच !
या नंतर पुढचा प्रवास होता ओस्लो ते कोपनहेगन क्रुझने ! डेन्मार्क ची राजधानी कोपनहेगन मध्ये रोझनबर्ग कॅसल, राजा राणी आणि परिवाराची घरे मोकळ्या स्वेअरमध्ये आहेत. इथे पार्लमेंट असले तरी जनतेच्या मनात राजघराण्याविषयी अपार श्रद्धा आहे. प्रचंड स्वच्छता आणि प्रामाणिकपणा यांचा संयम या शहरात जाणवतो. उत्तर युरोपीय देश निसर्ग समृद्ध तर आहेतच पण उच्च तंत्रज्ञान वापरून जगात आघाडीवर आहेत.
या सहलीचा जबरदस्त अनुभव प्रत्येकाने स्वत:च घ्यायला हवा. दर्यावर्दी म्हणून दोन दशके फिरून आल्यानंतरही माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले ते केवळ स्कँडिनेव्हियातच !!

श्री. श्रीकांत फणसाळकर
९७६९४८६१९७
PC:Unknown

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu